Home  |   Sitemap  |   Contact us

Institute of Management, Kolhapur
मातोश्री वृद्धाश्रमातील व्यक्तींसाठी उलट दत्तक घेण्याचा भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा एक वेगळा उपक्रम

सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वजन इतके व्यतीत आहेत की त्यांना घरातील वृद्धांना द्यायला वेळच शिल्लक नाही. त्यातच कामानिमित्त मुले घर सोडून दुरवर जाऊन नोकरी किवा व्यवसाय करतात आणि पर्यायाने घरातील वृद्ध व्यक्तींना मग वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. वृद्ध लोकांना यामुळे मानसिक व सामाजिक आनंद उपभोगता येत नाही आणि मनातील खंतही व्यक्त करता येन नाही. उतार वयात जेंव्हा खऱ्या अर्थाने आधाराची गरज असते, त्याच वेळी निराधार होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवते. हीच गरज ओळखून भारती विद्यापीठाच्या इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. नितीन नायक यांनी उलट दत्तक घेण्याची एक अभिनव कल्पना काढली. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारती विद्यापीठाच्या इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील विध्यार्थी व प्राध्यापक यांनी मिळून वृद्धाश्रमातील व्यक्तींना उलट दत्तक घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमा अंतर्गत नुकतीच इंस्टीट्यूटमधील संचालक, विध्यार्थी व प्राध्यापक यांनी आरके नगर कोल्हापूर येथील मातोश्री या वृद्धाश्रमास भेट दिली. सदर वृद्धाश्रम श्री शिवाजी पाटोळे व त्यांचे कुटुंबीय चालवतात. सध्या साधारण १२० वृद्ध त्यांच्या आश्रमात आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी व संचालक डॉ नितीन नायक यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला. प्रत्येक वृद्ध व्यक्तीची आस्थेने चौकशी केली. त्यांचा आत्ता पर्यंतचा जीवनप्रवास ऐकला. त्यांच्या भावना व यातना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना दत्तक घेण्याची कल्पना त्यांना सांगण्यात आली व हा उपक्रम आजन्म राबवण्यात येईल अशी ग्वाहीसुद्धा देण्यात आली. या अंतर्गत दोन विद्यार्थी एक आजी व एक आजोबा यांना दत्तक घेतील, त्यांची सेवा करतील, त्यांना दर आठवड्याला जाऊन भेटतील, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवतील. यामुळे वृद्धांच्या समस्या तर कमी होतीलच पण त्याबरोबरच विद्यार्थ्यांवरही चांगले संस्कार होतील व ते सामाजिक कार्याला हातभार लावतील. ही कल्पना उपस्थित सर्वांनाच आवडली व सर्वानी याचे स्वागत केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी करमणुकीचे कार्यक्रम सादर केले व त्यांचे मनोरंजन केले. शेवटी विद्यार्थ्यांनी, मातोश्री वृद्धाश्रम व संचालक डॉ नितीन नायक यांचे ही अनोखी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. त्याचबरोबर हा उपक्रम यशस्वी करून दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रा. मुकुंद कुलकर्णी (जन संपर्क विभाग)

© 2020 - Bharati Vidyapeeth, Pune. All rights reserved. Developed and maintained by Technology Department, Bharati Vidyapeeth.